आज सर्व रामभक्तांचे ५०० वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे लोकार्पण केले आहे. तसेच १२ वाजून २९ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गर्भगृहामध्ये पंतप्रधान मोदींनी विधीवत पूजा देखील केली. यावेळी गर्भगृहामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. त्यानंतर राममंदिराच्या सोहळ्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित समुदायाला संबोधित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांना संबोधित केले. यावेळी मोहन भागवत म्हणाले, ”जर का आपण संयम राखला तर पृथ्वी सर्वांची काळजी घेईल. कशाचाही लोभ न करता, संयम राखणे, अनुशासन राखणे तसेच आपल्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये अनुशासन राखणे या गोष्टी महत्वाच्या आहेत. भगिनी निवेदिता म्हणायच्या की, स्वतंत्र देशामध्ये नागरिकांप्रती संवेदना राखणे आणि नागरिक अनुशासनाचे पालन करणे हेच देशभक्तीचे रूप आहे. यामुळे जीवन पवित्र होते. आपण सगळे एकत्रित पुढे जाऊन आपल्या देशाला विश्वगुरु बनवू. ५०० वर्षांमध्ये अनेकांनी त्याग, संघर्ष करून आजचा हा आनंदाचा दिवस देशवासीयांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्या सर्वांप्रती आमच्या मनामध्ये आदर आहे.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साकेत हेलिपॅडवरून मंदिराच्या उत्तर दरवाजाने मंदिरात दाखल झाले. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे ५०० वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामलल्लाची मूर्ती पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. याची देही याची डोळा हा क्षण पाहायला मिळाल्याने प्रत्येक रामभक्ताला कृतकृत्य झाल्याच्या भावना आल्या. जय श्रीरामच्या घोषणेने मंदिर परिसर दुमदुमून गेला. , प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाच्या मूर्तीची पाहिलीय छायाचित्रे समोर आली आहेत. रामलल्लाची मूर्ती सोन्याने मढवण्यात आली आहे. तसेच प्रभूंच्या हातामध्ये सोन्याचा धनुष्यबाण आपल्याला पाहायला मिळतो. रामलल्लाला सुंदर अशा पोशाख परिधान करण्यात आला आहे. सोन्याचे पितांबर आणि सोन्याचे धनुष्यबाण असे स्वरूप आहे.