अयोध्या : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते.
हा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याकडून रामलल्लाची आरती करण्यात आली. तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी रामलल्लाच्या मूर्तीसमोर दंडवत प्रणाम केला आणि साधूंकडून आशीर्वादही घेतला.
तसेच भारतीय हवाई दलाच्या (IAF) हेलिकॉप्टरने अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर परिसरात रामलल्लाच्या मूर्तीचे अनावरण करताना फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला.
दरम्यान, भव्य मंदिरातील सोहळ्यासाठी 8,000 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक पंथांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. तसेच विविध आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींसह समाजाच्या सर्व स्तरातील लोकही या सोहळ्याला उपस्थित आहेत.