अयोध्या : आज अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा पार पडली. या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी “आता आपले रामलल्ला तंबूत राहणार नाहीत”, असे वक्तव्य मोदींनी केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “या शुभ सोहळ्यासाठी देशातील सर्व जनतेचे खूप खूप अभिनंदन. शतकानुशतके असंख्य लोकांनी दिलेल्या बलिदानानंतर आज हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. अभूतपूर्व संयम, त्याग आणि तपश्चर्येनंतर अखेरीस आपले प्रभू राम आले आहेत. तसेच आता आपले रामलल्ला तंबूत राहणार नाहीत, ते या भव्य मंदिरात राहतील.”
“राम मंदिराच्या उभारणीने लोकांमध्ये एक नवीन ऊर्जा भरली आहे. तसेच 22 जानेवारी 2024 ही केवळ एक तारीख नाही, तर एका नव्या युगाची सुरुवात आहे. देश गुलामगिरीच्या कचाट्यातून मुक्त झाला आहे. हजारो वर्षांनंतरही लोकांना ही तारीख आणि हा क्षण आठवेल. तसेच हा रामाचा परम आशीर्वाद आहे की आम्ही त्याचे साक्षीदार आहोत”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “प्रभू राम भारतातील सर्व नागरिकांच्या आत्म्यात आहेत आणि संपूर्ण देश आज दिवाळी साजरी करत आहे. तसेच आज मी प्रभू रामाची माफी मागतो कारण आमच्या प्रेमात आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता होती ज्यामुळे हे काम (राम मंदिराचे बांधकाम) इतकी वर्षे झाले नाही. मात्र, आज ती दरी भरून निघाली आहे आणि मला खात्री आहे की, भगवान राम आम्हाला माफ करतील.”
9 नोव्हेंबर 2019 रोजी निकाल देऊन मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा करणाऱ्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पंतप्रधान मोदींनी आभार मानले. “रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पण यावर न्याय केल्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानू इच्छितो”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.