आज अयोध्येत रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यामुळे फक्त भारतच नाही तर संपूर्ण जग राममय झाले आहे. अशातच आता मेक्सिकोमध्ये देखील पहिल्या राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आहे. तसेच यावेळी अमेरिकी पंडिताने श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा पार पाडली. 21 जानेवारी रोजी सायंकाळी हा सोहळा पार पडला.
याबाबत मेक्सिकोमधील भारतीय दूतावासाने X वर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने लिहिले आहे की, “मेक्सिकोमध्ये भगवान रामाचे पहिले मंदिर बांधण्यात आले आहे. अयोध्येतील ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याच्या एक दिवस आधी, मेक्सिकोच्या क्वेरेटारो शहरात श्री राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच तेथे भगवान हनुमानाचेही पहिले मंदिर बांधण्यात आले असून त्याचेही उद्घाटन करण्यात आले आहे,”
मंदिर आणि सोहळ्याचे फोटो शेअर करत दूतावासाने लिहिले की, मेक्सिकोच्या राम मंदिरात भगवान रामाची मूर्ती ही भारतातून आणण्यात आली आहे. भजन आणि आरतीमुळे मंदिरातील वातावरण दैवी उर्जेने भरून गेले होते. यावेळी भारतीय वंशाचे लोक जय श्री रामच्या घोषणा देत होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना पार पडली. या धार्मिक विधींसाठी पंतप्रधान मोदींसह गर्भगृहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.
तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साकेत हेलिपॅडवरून मंदिराच्या उत्तर प्रवेशदारमधून मंदिरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी आजच्या या सोहळ्यासाठी खास पोशाख परिधान केला होता. पंतप्रधान मोदींनी कुर्ता आणि धोतर असा खास पोशाख परिधान केला होता. मंदिराच्या परिसरात दाखल झाल्यानंतर मोदी चांदीचे छत्र घेऊन राम मंदिराच्या गर्भगृहात पोहोचले होते.