आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यामुळे संपूर्ण जगभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. पण या राम मंदिराच्या उभारणीमागील कथा अत्यंत क्रूर आणि भयानक अशी आहे. कारण एक काळ असा होता की रामाच्या जमिनीचा हक्क मागणाऱ्या कारसेवकांवर गोळ्या झाडल्या जात होत्या.
या गोळीबारात अनेक कारसेवक मारले गेले होते. त्यामुळे या राम मंदिराच्या उभारणीमागे अनेकांचे योगदान आहे. त्यापैकी दोन उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा. साध्वी ऋतंभरा नुकत्याच इंडिया टीव्हीच्या आप की अदालत या शोमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी राम मंदिरावर मोकळेपणाने चर्चा केली होती.
तसेच आज राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यानिमित्त जेव्हा उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा राम मंदिर परिसरात एकमेकींना भेटल्या, तेव्हा तो क्षण भावूक झाला. यावेळी साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांनी एकमेकांना मिठी मारली अन् त्या दोघींना अश्रू अनावर झाले.
साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांचे राम मंदिराच्या उभारणीत मोठे योगदान आहे. बाबरी मशीद पाडण्याआधी उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा या कारसेवकांमध्ये उत्साह निर्माण करत होत्या. त्यांच्या भाषणाचा परिणाम असा झाला की, कारसेवक न थकता, न थांबता आणि नतमस्तक न होता करसेवा करत राहिले होते. दरम्यान, अयोध्येत जेव्हा साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांची भेट झाली तेव्हा दोघींचे डोळे भरून आले.