आज अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली.देशभरातल्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदींसह गाभा-यात सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन मेहता आणि पुजारी उपस्थित होते. मोदींनी पूजा केल्यानंतर रामलल्लाच्या चांदीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीसमोरचा पडदा हटवण्यात आला आणि लोभस आणि मनमोहक अश्या बाल राघवांचे दर्शन जगाला झाले,
ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण आज अख्ख्या जगाने प्रत्यक्ष अनुभवला.अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसोबत उत्सव साजरा केला. ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिरात मुख्यमंत्र्यांनी हा सोहळा लाईव्ह पाहिला.आणि त्या नंतर मुख्यमंत्र्यांनी जय श्रीरामचा एकच जयघोष केला.मुख्यमंत्री शिंदेंनी ढोल वाजवून आपला आनंद साजरा केला.
तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातल्या रामनगर इथल्या राममंदीर परिसरातून अयोध्येतला प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहिला.श्रीरामाच्या मूर्तीवरचा पडदा दूर होताच देवेंद्र फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया खुपच बोलकी होती. मूर्ती अतिशय सुंदर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच आपण लवकरच प्रभू श्रीरामांचे दर्शन घ्यायला जाणार असल्याचे सांगितले.