आज तब्बल ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देशवासियांचे, रामभक्तांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. प्रभू श्रीराम अयोध्येतील आपल्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य राम मंदिराचे लोकार्पण केले. तसेच मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना देखील केली. यावेळी गर्भगृहामध्ये केवळ पाचच व्यक्तींना या विधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. प्राणप्रतिष्ठपना होण्याआधी व त्यानंतर दिवसभरात कोणकोणते कार्यक्रम घडले याचा एक सविस्तर आढावा घेऊयात.
सर्वात प्रथम सकाळच्या सुमारास राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायर्क्रमस्थळाची पाहणी केली. ज्या मार्गाने व्हीआयपी व्यक्ती मंदिरात प्रवेश करणार आहेत तसेच प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला.त्यानंतर अयोध्येमध्ये या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. सकाळच्या सुमारास सोहळ्याच्या आधी अनेक बॉलिवूड अभिनेते, क्रीडापटू, राजकीय मंडळी, उद्योगपती मंदिर परिसरात दाखल झाले. त्यामध्ये रजनीकांत, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, मिताली राज, विराट कोहली, मुकेश अंबानी , अनिल अंबानी, श्री श्री रविशंकर, बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासह अनेक मान्यवर मंदिर परिसरामध्ये उपस्थित राहिले होते.
त्यानंतर सुमारे ११. ३० वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी साकेत हेलिपॅडवर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या. मुख्य सोहळ्याच्या काही क्षण आधी नरेंद्र मोदी हे मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वारातून मंदिर परिसरामध्ये दाखल झाले. त्यांनी आजच्या सोहळ्यासाठी खास पोशाख परिधान केला होता. त्यानंतर प्राणप्रतिष्ठपनेच्या मुहूर्ताआधी त्यांनी गर्भगृहात प्रवेश केला. तिथे त्यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत , रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधीवत पूजेला सुरुवात झाली. त्यानंतर १२ वाजून २९ मिनिटांनी असलेल्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान मोदींनी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठपना केली आणि तब्बल ५०० वर्षानंतर सर्व रामभक्तांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतर प्रभू श्रीरामांची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मोदींनी रामल्लाला साष्टांग नमस्कार देखील केला. त्यानंतर आरती करण्यात आली. यावेळेस मंदिराच्या बाहेर उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी जय श्रीरामच्या देत अवघा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि इतर मान्यवर गर्भगृहातून बाहेर आले.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाचे पहिले वाहिले तेजस्वी रुप समोर आले आहे. प्रत्येक देशवासिय प्रभू श्रीरामाचे हे लोभसवाणे रुप डोळ्यांत साठवून घेत आहेत. हा डोळ्यांचं पारणे फेडणारा अयोध्येतील सोहळा याची जन्मी याची देही अनुभवताना प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आहेत.
प्रभू श्रीराम भव्य राम मंदिराच्या गर्भगृहात विधीवत विराजमान झाले असून त्यांचा पहिली फोटो समोर आला आहे. निरागस चेहरा, ओठांवर स्मित हास्य आणि चेहऱ्यावर अद्भुत तेज असलेले हे राम लल्ला अतिशय मनमोहक आणि पहिल्या नजरेत मनाचा ठाव घेणारे आहेत. कृष्णशिलेत कोरण्यात आलेले प्रभू श्रीरामाचे मोहक,निरागस रुप मनात पाहताक्षणी ठसावे असेच आहे. ५१ इंचाची ही रामलल्लाची मूर्ती दागिन्यांनी सजलेली आहे. भगवान श्रीराम यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. गळ्यात मोत्याचा हार आहे. कानात झुमके आहेत. त्यांच्या हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण आहे. रामलल्ला यांना पिवळ्या रंगाचे पितांबर नेसवले आहे.
त्यानंतर रामजन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर गोविंदगिरी महाराजांनी आणि इतर महंतांनी व्यासपीठावर उपस्थित नरेंद्र मोदी, मोहन भागवत, योगी आदित्यनाथ, आनंदीबेन पटेल यांचा सत्कार केला. गोविंदगिरी महाराजांनी संबोधन करताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास यांचा देखील उल्लेख केला.
यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, ”माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मला शब्द सापडत नाहीत. मी भावनांनी भारावून गेलो आहे आणि मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना असेच वाटत असेल. आज या शुभ प्रसंगी, “प्रत्येकाच्या मनात भगवान राम आहे, आणि प्रत्येकाचे डोळे आनंद आणि समाधानाच्या अश्रूंनी भरले आहेत. हा भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. तसेच ही ‘रामराज्या’ची सुरुवात आहे. आपण त्रेतायुगात प्रवेश केल्याचे दिसते,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी हा दिवस प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या दीर्घ संघर्षाचे स्मरण केले. ते म्हणाले, “श्री रामजन्मभूमी ही कदाचित पहिलीच अनोखी घटना आहे जिथे त्यांच्याच देशातील बहुसंख्य समाजाला त्यांच्याच देवतेच्या जन्मस्थानी मंदिर बांधण्यासाठी इतक्या पातळ्यांवर लढा द्यावा लागला.”मात्र आता अयोध्या गोळ्यांच्या आवाजाने नव्हे तर भगवान रामाच्या नावाने गुंजेल, असेही म्हणाले आहेत. “आता अयोध्येतील रस्ते बंदुकीच्या गोळ्यांनी गुंजणार नाहीत. कर्फ्यू नसेल.आता इथे दीपोत्सव आणि रामोत्सव होईल.श्री रामाचे नाव ‘संकीर्तन’ रस्त्यावर गुंजेल कारण इथे रामलल्लाची स्थापना झाल्याची घोषणा आज झाली आहे. योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, आज या लढ्यात खर्ची पडलेल्या कारसेवकांच्या आत्म्याला आनंद वाटत असेल , कारण ज्या जागेसाठी संकल्प करण्यात आला त्याच ठिकाणी मंदिर बांधले गेले आहे. “या कार्यक्रमाने संपूर्ण देश आनंदित झाला आहे आणि या पिढीला मोठे नशीब आहे की ते या भव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होऊ शकले. सध्या जगाचे लक्ष अयोध्येकडे आहे आणि प्रत्येकाला येथे यायचे आहे,” असे मुख्यमंत्री योगी म्हणाले आहेत. . श्री रामजन्मभूमी मंदिरात विराजमान श्रीरामाच्या मूर्तीचे बालस्वरूप प्रत्येक सनातन आस्तिकाच्या जीवनात धर्माचे पालन करण्याचे स्मरण देत राहील.”
त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आपले संबोधनात म्हणाले, ”जर का आपण संयम राखला तर पृथ्वी सर्वांची काळजी घेईल. कशाचाही लोभ न करता, संयम राखणे, अनुशासन राखणे तसेच आपल्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये अनुशासन राखणे या गोष्टी महत्वाच्या आहेत. भगिनी निवेदिता म्हणायच्या की, स्वतंत्र देशामध्ये नागरिकांप्रती संवेदना राखणे आणि नागरिक अनुशासनाचे पालन करणे हेच देशभक्तीचे रूप आहे. यामुळे जीवन पवित्र होते. आपण सगळे एकत्रित पुढे जाऊन आपल्या देशाला विश्वगुरु बनवू. ५०० वर्षांमध्ये अनेकांनी त्याग, संघर्ष करून आजचा हा आनंदाचा दिवस देशवासीयांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्या सर्वांप्रती आमच्या मनामध्ये आदर आहे.”
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू श्रीराम, सर्व उपस्थित साधू संत यांना प्रणाम करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, ””हे शुभ कार्य आम्ही गेली अनेक वर्षे करू शकलो यासाठी मला प्रभू श्रीरामाची क्षमा मागायची आहे. राम मंदिर बांधले तर देशातील वातावरण बिघडेल असे काही जणांचे म्हणणे होते. मात्र असे म्हणणारे लोकं परिपक्व समाजामध्ये गणले जात नाहीत. राम आग नव्हे तर ऊर्जा आहे. मला खूप काही बोलायचे आहे, मात्र माझा कंठ दाटून आला आहे. आपले राम आले आहेत. आता ते तंबूत नाही तर आपल्या भव्य मंदिरात राहतील. या शुभ सोहळ्यासाठी देशातील सर्व जनतेचे खूप खूप अभिनंदन. शतकानुशतके असंख्य लोकांनी दिलेल्या बलिदानानंतर आज हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. अभूतपूर्व संयम, त्याग आणि तपश्चर्येनंतर अखेरीस आपले प्रभू राम आले आहेत. तसेच आता आपले रामलल्ला तंबूत राहणार नाहीत, ते या भव्य मंदिरात राहतील. राम मंदिराच्या उभारणीने लोकांमध्ये एक नवीन ऊर्जा भरली आहे. तसेच 22 जानेवारी 2024 ही केवळ एक तारीख नाही, तर एका नव्या युगाची सुरुवात आहे. देश गुलामगिरीच्या कचाट्यातून मुक्त झाला आहे. हजारो वर्षांनंतरही लोकांना ही तारीख आणि हा क्षण आठवेल. तसेच हा रामाचा परम आशीर्वाद आहे की आम्ही त्याचे साक्षीदार आहोत.”
आपले भाषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे उपस्थितांना अभिवादन करण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असणाऱ्यांना अभिवादन केले आणि त्यांचे अभिवादन स्वीकारले. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. या सोहळ्याच्या वेळी ५० वाद्ये वाजवण्यात आली आहेत. राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक कारागिरांनी अहोरात्र कष्ट केले आहेत. मेहनत घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व कारागिरांची भेट घेतली व त्यांच्यावर पुष्पवर्षाव करून त्या सर्वांचे आभार मानले.
आता उद्यापासून म्हणजेच २३ जानेवारीपासून सर्व सामान्य नागरिकांसाठी राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. तसेच देशभरात आज दिवाळी साजरी केली जात आहे. ठिकठिकाणी फटाके फोडून ,मंदिरांमध्ये आरत्या करून, भजने गाऊन हा सोहळा साजरी करण्यात येत आहे. अनेकांनी या मंदिराच्या निर्मितीसाठी आपले योगदान दिले आहे. प्रसंगी आपले प्राण देखील या संघर्षामध्ये अर्पण केले आहे. त्या सर्वांचे अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभे राहण्याची इच्छा अखेर आज पूर्ण झाली आहे. देशभरामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.