अयोध्येत श्रीराम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात जनचेतना जागवण्याचे काम करणाऱ्या साध्वी ऋतुंभरा आणि उमा भारती यांची सोमवारी अयोध्येत भेट झाली. यावेळी दोन्ही साध्वींनी एकमेकींची गळाभेट घेतली. संघर्षाची सुखकारक फलश्रुती पाहून दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रु तराळल्याचे पाहून उपस्थितांना गीत रामायणातील “कृतार्थ दिसती तुझी लोचने; कृतार्थ मीही तुझ्या दर्शने” या ओळींचे अलबत स्मरण झाले.
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात वैदिक मंत्रोच्चारात प्रभू रामचंद्रांना अभिषेक करण्यात आला. या अभिषेक सोहळ्यात देश-विदेशातून 7 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. दरम्यान, राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा यांची भेट होताच दोघींनी एकमेकींना मिठी मारली. अयोध्या आंदोलनात दोघींनी दिलेले योगदान, सोसलेले कष्ट आणि त्याची सकारात्मक फलश्रुती म्हणून अयोध्येत साकारलेले भव्य राम मंदिर या आठवणी आणि आंदोत्सवाच्या संमिश्र भावनांचे आनंदाश्रु दोघींच्याही डोळ्यात तराळले. अयोध्येत कारसेवकांनी 6 डिसेंबर 1993 रोजी वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, अशोक सिंघल, गिरीराज यांच्यासह साध्वी ऋतुंभरा आणि उमा भारती यांनाही आरोपी बनवण्यात आले होते. याप्रकरणी अनेक वर्ष चाललेल्या खटल्यानंतर 30 सप्टेंबर 2020 रोजी या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
यावेळी साध्वी ऋतुंभरा म्हणाल्या की, राम मंदिर आंदोलनादरम्यान प्रभू रामाने मंदिरासाठी लढत राहण्याची हिंमत आणि क्षमता दिली होती. या सोहळ्यात सहभागी झालेले सर्व लोक भाग्यवान आहेत. या क्षणाला मनातील भाव शब्दात मांडणे कठीण आहे. प्रभू राम मंदिराचे बांधकाम हे हिंदू समाजाने दाखवलेल्या धाडसाचे परिणाम आहे. अनेक लोकांच्या हौतात्म्याची फलश्रुती आहे. हिंदू समाजाने 500 वर्षांहून अधिक काळ मंदिरासाठी संघर्ष केला त्यामुळे मिळालेले यश अवर्णनीय असल्याचे ऋतुंभरा यांनी सांगितले.