अयोध्या इथे होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये सकाळपासूनच उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण दिसून आले. शहरातील सर्व मंदिरांना रोषणाई आणि रंगीबेरंगी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणच्या सोसायटी आणि व्यापारी संकुल येथे श्रीरामाचे विविध जीवन रूप व्यक्त करणाऱ्या रंगीत रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शहरातील प्रसिद्ध किराडपुडा येथील श्रीरामाच्या मंदिरात 105 किलो वजनाच्या लाडूचा प्रसाद आज वितरित करण्यात आला. सर्व राजकीय पक्षाच्या वतीने महाआरती देखील करण्यात आली .रात्री बारा वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत. शहरातील मुख्य चौकात श्रीरामाच्या प्रतिमा जागोजागी दिसून येत असून त्यांचं पूजन करण्यात येत आहे. शहरातील माहेश्वरी समाजाच्या वतीने खडकेश्वर येथील महादेव मंदिराच्या परिसरात 11111 दीप महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान हा दीप महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. शहरात सकाळपासूनच पारंपारिक वेशभूषा धारण करून युवक युवती ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. भगवे फेटे डोक्यावर आणि हातात भगवे ध्वज घेऊन धार्मिक वेशभूषेतील बालक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत शहरांमध्ये जागोजागी आयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे दूरदृष्य प्रणाली द्वारे थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते.
समर्थ नगर येथील राम मंदिरात थेट प्रक्षेपण बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. प्राणप्रतिष्ठापने नंतर गुलमंडी परिसरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला जागोजागी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. श्री रामांच्या प्रतिमेची मिरवणूक देखील ठीक ठिकाणी आज मोठ्या उत्साहात काढण्यात आली आहे. यात महिला भाविकांचा समावेश अधिक प्रमाणात होता शहरातील नगरखाना येथील ३५० वर्षांपूर्वीच्या श्रीरामाच्या मूर्तीची आज विधिवत पूजा गुजराती लेवा पाटीदार समाजाच्या वतीने करण्यात आली. शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती येथे लवकुश यांच्या वेशभूषा करून आलेल्या बालकांनी सगळ्यांच्याचे लक्ष वेधले होते. औरंगपुरा येथे महाध्वज लावण्यात आलेला असून गांधी पुतळा परिसर, गुलमंडी परिसराच्या रस्त्याच्या दुतर्फी भगव्या पताका तसेच जागोजागी भगवे ध्वज लावण्यात आलेले आहे. शासकीय कला व विज्ञान महाविद्यालयाच्या संगीत विभाग प्रमुख डॉ. वैशाली देशमुख यांनी श्रीरामाच्या वर आधारित गायलेल्या रचनेला अधिक प्रसिद्धी मिळत आहे. शहरातील संजय कट्टू यांनी सायकलवर श्रीरामाच्या प्रतिमा तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काव्याच्या फलकांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.