प्रभू श्रीरामांचे अयोध्या येथे तब्बल पाचशे वर्षांनंतर भव्यदिव्य राम मंदिर साकारण्यात आले आहे. या मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडताच अमरावती शहराच्या राजकमल चौकात भव्य दिव्य असा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यातील समस्त हिंदू बांधव, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष राजकमल चौकात एकवटले होते. यासोबतच खेडी असो वा शहर, प्रत्येक मंदिर आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहे. घराघरांवर लावण्यात आलेले भगवे झेंडे, पताका आणि श्रीरामांच्या ध्वजाने नागरीवस्त्या राममय झाल्या असून, भक्तांमध्ये दिवाळीसमान आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
प्राचीन अंबादेवी- एकवीरादेवी मंदिर मकर संक्रांतीपासूनच रोषणाईने सजले असून, सकाळी-संध्याकाळी पूजाअर्चा, प्रसाद वाटप निरंतरपणे सुरू आहे. सराफा बाजारातील काळाराम मंदिर, राजापेठ आणि बडनेरा येथील गुरुद्वारांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. जुने कॉटन मार्केट परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिर रोषणाईने उजळले असून, अयोध्या येथून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. बडनेरा येथील यवतमाळ मार्गालगतच्या झिरी येथील राम मंदिर, दत्त मंदिर, जुनीवस्ती स्थित गोडबोले यांच्या निवासस्थानी श्रीराम मंदिर यासह जिल्ह्याभरात मंदिरांमध्ये भजन, दीपोत्सव, महाप्रसाद व राम यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच श्रीराम रथयात्रा, शोभायात्रा, गीत रामायण, कीर्तन, सुंदरकांड, हनुमान चालिसा पठण, महाआरती, पालखी सोहळा, रांगोळी स्पर्धा, श्रीराम कथा चित्र रेखाटन स्पर्धा, महाप्रसाद असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या नेतृत्वात राजकमल चौक,चौक, गांधी चौक यासह अन्य ठिकाणी पाच हजार किलो बुंदी लाडू वाटप होणार आहे. शहरातील राजकमल – चौक, राजापेठ, जयस्तंभ चौक, गांधी या प्रमुख चौक या प्रमुख चौकात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा थेट बघता यावा, यासाठी मोठे स्क्रिन लावले होते.
संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक सुवर्ण क्षण – आमदार प्रवीण पोटे पाटील
ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होते तो सुवर्ण क्षण आला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज शुभ मुहूर्तावर श्री रामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली राजकमल चौक अमरावती येथे प्रतिष्ठापना प्रक्षेपण मधे भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी उपस्थित राहून या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार झाले.
प्रभू श्रीरामाचे आदर्श आणि विचार भारताच्या आत्म्यात वास करतात. त्यांचे चरित्र आणि जीवनाचे तत्वज्ञान हे भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ आहेत. श्री राम मंदिर उभारणीमुळे पवित्र भूमी अयोध्या पुन्हा एकदा संपूर्ण वैभवाने जगासमोर येईल.या भव्य भगवान श्री राम मंदिराच्या उभारणीतून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे कणखर आणि निर्णायक नेतृत्व दिसून येते. आज अतिशय लोभस श्री रामाचे दर्शन झाले माझे जीवन कृतकृत्य झाले असे मत यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी व्यक्त केलेया प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी लाडूच्या प्रसादाचे व मिठाईचे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.