लोकसभा निवडणूक काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. अशातच आता विरोधी पक्षातील नेत्यांना ईडीने चांगलेच घेरले आहे. आत्ताच्या या तीन दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, ठाकरे गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर या तिघांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे.
महाविकास आघाडीच्या या तिन्ही नेत्यांची चौकशी आज (23 जानेवारी), उद्या आणि परवा या तीन दिवसांमध्ये केली जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता मुंबईत ईडी कार्यालयामध्ये ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची चौकशी होणार आहे. रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार आहे. तसेच रवींद्र वायकरांवर मनी लाँड्रिंगचा आणि बनावट कागदपत्र बनवण्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यामुळे आज त्यांची ईडी चौकशी होणार आहे.
तर उद्या आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीदरम्यान शरद पवार देखील कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कारखान्यावर ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर ईडीने रोहित पवारांना समन्स बजावले होते.
रोहित पवारांनंतर माजी महापौर किशारी पेडणेर यांची देखील ईडीकडून चौकशी होणार आहे. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी ईडीने किशोरी पेडणेकरांनी नोटीस पाठवली होती. त्यामुळे आता पेडणेकरांनाची देखील ईडीकडून चौकशी केली जाणार आहे.