काल (22 जानेवारी) अयोध्येत रामलल्ला भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यानंतर फक्त अयोध्येतच नाही तर संपूर्ण जगभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. तसेच हा भव्य सोहळा काल कोट्यावधी लोकांनी टीव्ही, ओटीटी आणि यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहिला.
विशेष म्हणजे रामलल्लाच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने अनोखा विक्रम केला आहे. या खास सोहळ्याने यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनलवरील रामलल्ला प्रतिष्ठा या व्हिडीओने यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमद्वारे सर्वाधिक व्ह्यूज मिळवले आहेत.
यूट्यूबवर हा खास सोहळा तब्बल 19 मिलियन लोकांनी लाईव्ह पाहिला आहे. पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब चॅनलवर या सोहळ्याचे दोन व्हिडीओ ब्रॉडकास्ट करण्यात आले होते. यातील एका व्हिडीओला 9 मिलियन लोकांनी पाहिले आहे तर दुसऱ्या व्हिडीओला 10 मिलियन लोकांनी पाहिले आहे.
या सोहळ्याच्या व्हिडीओने यूट्यूबवर एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या व्हिडीओने चांद्रयान 3 लँडिंग आणि फिफा वर्ल्डकप सामने या लाईव्ह व्हिडीओंना देखील मागे टाकले आहे.