काल (22 जानेवारी) अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचा अभिषेक पूर्ण झाला आहे. या सोहळ्यात देशातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. व्यवसायिक जगतातील मुकेश अंबानीही आपल्या संपूर्ण कुटुंबासह अयोध्याधामला पोहोचले होते. तर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर अंबानी कुटुंबाने रामलल्लाचे दर्शन घेतले.
रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर मुकेश अंबानी यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला 2.51 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या देणगीशी संबंधित घोषणा अंबानी कुटुंबाकडून रामलल्लाच्या अभिषेक प्रसंगी मंदिराला भेट दिल्यानंतर लगेचच करण्यात आली.
मुकेश अंबानी हे पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा आणि जावई आनंद पिरामल, मुले आकाश आणि अनंत, सून श्लोका मेहता आणि लवकरच होणारी सून राधिका मर्चंट यांच्यासह अयोध्येत आले होते. मंदिरात जाण्यापूर्वी मुकेश अंबानी म्हणाले की, आज प्रभू राम येत आहेत, 22 जानेवारीला संपूर्ण देशात राम दिवाळी असेल. तसेच मुकेश अंबानींचा मुलगा आकाश म्हणाला की, हा दिवस इतिहासाच्या पानांमध्ये लिहिला जाईल, आम्हाला इथे आल्याचा आनंद होत आहे.
दरम्यान, मुकेश अंबानी यांनी यापूर्वीही अनेक मंदिरांना देणगी दिली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीला त्यांनी 5 कोटी रुपयांची देणगी दिली होती. तर फेब्रुवारी 2023 मध्ये, त्यांनी आणि त्यांचा मुलगा आकाश गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली आणि ट्रस्टला 1.51 कोटी रुपये दान केले होते.