बारामती ऍग्रो प्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे. या चौकशीचा विरोध करण्यासाठी आणि रोहित पवारांच्या समर्थनार्थ पक्ष शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार ईडी कार्यालयाजवळ असलेल्या पक्षाच्या कार्यालयात दिवसभर थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे या रोहीत पवारांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. दरम्यान ईडी चौकशी आधी रोहित पवारांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
रोहित पवारांनी आपल्या ईडी चौकशीआधी ‘एक्स’ वर पोस्ट शेअर केली आहे. त्यात रोहित पवार म्हणाले, ”#ED कार्यालयात उद्या (बुधवार दि. २४ जानेवारी) चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत #ED ने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं रहावं. कारण आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय!
माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या खा. सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय!”
काही दिवसांपूर्वी ईडीने बारामती ऍग्रो या रोहित पवारांच्या कंपनीवर छापेमारी केली होती. मुंबईसह सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. मागील अनेक दिवसांपासून रोही पवारांवर आदींची छापेमारी सुरु होती. मात्र त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले नव्हते. मी सरकारच्या विरोधात विविध मुद्द्यांवर भाष्य करतोय. यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचे काम सुरु आहे. मात्र नोटीस आल्यानंतर रोहित पवारांनी चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.