भाजप नेते आणि बेगुसरायचे खासदार, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अयोध्येबाबत गिरीराज सिंह म्हणाले की, रामलल्लाचे मंदिर नुकतेच बांधले गेले आहे. ही तर फक्त एक झलक आहे, कारण अजून काशी-मथुरा बाकी आहे. गिरीराज सिंह यांनी सोमवारी (२२ जानेवारी) संध्याकाळी उत्तर बिहारमधील पवित्र गंगा नदीच्या तीरावर असलेल्या जानकी पौरी घाटावर बोलताना हे वक्तव्य केले आहे.
सिमरिया धाम येथे आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह पोहोचले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना गिरीराज सिंह यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी आपला संकल्प पूर्ण केला आहे. त्यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 11 दिवसांचा उपवास केला होता. तसेच विरोधकांकडून आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या गेल्या. पण भारतातील सनातन आता जागे झाले आहे, असे गिरीराज सिंह म्हणाले.
दरम्यान, अयोध्येत रामलल्लाच्या मुर्तीचा अभिषेक झाल्यानंतर बेगुसरायमधील साधू-मुनींमध्येही आनंदाचे वातावरण होते. सर्व मंगला आश्रमाचे संरक्षक चिदात्मण जी महाराज म्हणाले की, रामलल्ला पुन्हा एकदा अयोध्येत विराजमान झाल्याचा संत-मुनींमध्ये मोठा आनंद आहे. रामललाच्या अभिषेकनंतर सिमरियाचे महत्त्व आणखी वाढले आहे.
एकीकडे अयोध्येत भव्य कार्यक्रम झाला, तर दुसरीकडे बेगुसरायमध्येही सिमरिया गंगा घाटावर एक लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. गंगा आरतीही करण्यात आली, ज्यात शेकडो भाविक सहभागी झाले होते आणि त्यांनी जय श्री रामचा नारा देत आपला आंतरिक उत्साह दाखवला.