काल अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याचाच उत्साह देशामध्ये असताना काल नाशिकच्या काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवशेन सुरु आहे. ३० वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिवेशन घेतले होते. आजच्या अधिवेशनामध्ये खासदार संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
संजय राऊत यांनी उपस्थितांना संबोधित केले. संबोधित करताना संजय राऊत म्हणाले, ” संपूर्ण देशातील वातावरण राममय झाले आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी ज्योत पेटवली आहे. शिवसेना नसती तर, अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती. सेनेचे वाघ तिकडे गेले म्हणूनच काळ पंतप्रधान मोदींना रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करता आली. प्रभू श्रीरामाने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष नाशिकमध्ये केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या पुण्यभूमीची निवड केली आहे.”
तसेच पुढे बोलताना राऊत म्हणाले, ”नाशिकमधील एका होर्डिंगवर संयमी योद्धा असे लिहिले होते. ही उपाधी प्रभू श्रीरामाला शोभून दिसत होती. आता ती उद्धव ठाकरेंना दिसत आहे. मला तर आता वाटते की प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या हातात मशाल येईल. दिल्लीच्या रावणशाहीसमोर झुकणार नाही.” संजय राऊत यांनी अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे यांना संयमी योद्धा संबोधले. तसेच काल काळाराम मंदिरात ठाकरे गटाने प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले आरती केली. ठाकरे गटाच्या अधिवेशनामध्ये २ हजार पदाधिकारी येणार असल्याची माहिती समोर आली आहे.