कोलकाता : पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी मोठे वक्तव्य केले आहे.जर नेताजी सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान असते तर भारताची फाळणी टाळता आली असती असे मला वाटते, असे वक्तव्य सुवेंदू अधिकारी यांनी केले आहे.
“माझा विश्वास आहे की जर नेताजी सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर आपल्या देशाची फाळणी झाली नसती. भारतातील प्रत्येकजण सुखी झाला असता. भारत गरिबी, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारापासून मुक्त झाला असता,” असे सुवेंदू अधिकारी म्हणाले आहेत . स्वातंत्र्यसैनिकांच्या जयंतीनिमित्त कोलकाता येथे नेताजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
पुढे राष्ट्रीय राजधानीच्या कर्तव्यपथावर नेताजींचा पुतळा उभारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानून सुवेंदू अधिकारी म्हणाले की, “आज आम्ही पराक्रम दिवस साजरा करत आहोत आणि नेताजींना श्रद्धांजली वाहतो आहोत. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारल्याबद्दल आम्ही आमच्या पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे राजकीय प्रचारात रूपांतर केल्याच्या विरोधकांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना सुवेंदू अधिकारी यांनी गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्याचे निदर्शनास आणून दिले. “जेव्हा राम मंदिर अस्तित्वात नव्हते तेव्हा 2014 आणि 2019 मध्ये पंतप्रधान मोदी जिंकले नाहीत का?” असा सवाल करत त्यांनी भाजपचा विजय निदर्शनास आणून दिला.
तसेच “मतांचे भुकेले” असलेले लोक वगळता सोमवारी भगवान रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर संपूर्ण देश ‘राममय’ झाला आहे. हा आनंदाचा क्षण आहे. रामलल्ला त्यांच्या जन्मभूमीत परत आले आहेत.हिंदू-सनातनी आनंदी आहेत. इतर धर्मातील लोकही आनंदी आहेत”, असेही अधिकारी म्हणाले.