नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (23 जानेवारी) पराक्रम दिनानिमित्त महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे अतूट समर्पण आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान मोदींनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. “शौर्य दिनानिमित्त भारतीय जनतेला शुभेच्छा. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांच्या जीवनाचा आणि धैर्याचा आदर करतो. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे अतूट समर्पण आजही आपल्याला प्रेरणा देते”, असे मोदींनी म्हटले आहे.
तसेच पंतप्रधान मोदी मंगळवारी संध्याकाळी लाल किल्ल्यावर शौर्य दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौज यांच्या उल्लेखनीय प्रवासाची ओळख करून देणारे अभिलेख प्रदर्शन, दुर्मिळ छायाचित्रे आणि कागदपत्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. “स्वातंत्र्य संग्रामातील महान नायक, ‘आझाद हिंद फौज’चे नेते, ‘नेताजी’ सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!” अशी पोस्ट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी X वर शेअर केली आहे.
2021 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सरकारने 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून घोषित केला होता.