काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये भव्य-दिव्य राम मंदिराचे लोकार्पण केले. तसेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना देखील केली. यावेळी गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते. २२ जानेवारी हा दिवस पंतप्रधान मोदींनी दिवाळीसारखा साजरा करण्याचे आवाहन केले होते.
राम मंदीराचे लोकापर्ण होणे आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठपना होणे हा राजयोग तब्बल ५०० वर्षानंतर देशवासियांना अनुभवता आला. कारसेवकांनी आणि अनेक नेत्यांनी , लोकांनी केलेल्या संघर्षाला यश प्राप्त झाले. रामभक्तांची तब्बल ५०० वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली. यानिमित्ताने देशभरात अनेक कार्यरकांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी फटाके फोडून, पणत्या लावून, आरत्या म्हणून हा सोहळा साजरा करण्यात आला. तर फक्त भारतातच नव्हे तर जगभरामध्ये राम मंदिराचा सोहळा साजरा करण्यात आला. तब्बल ४० देशांमध्ये जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आल्या.
अमेरिकेसह, युरोप आणि आशिया खंडातील देशांमध्ये असलेल्या मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ४० देशांमध्ये असणाऱ्या भारतीय नागरिकांनी हा सोहळा, आनंदोत्सव साजरा केला. तेथील स्थानिक वेळेनुसार हा सोहळा साजरा करण्यात आला. न्यूयॉर्क येथील टाइम्स स्केवर येथे देखील भारतीय नागरिकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी भव्य पडद्यावर प्रभू श्रीरामाचे चित्र झळकविण्यात आले होते. तेथील नागरिकांच्या जय श्रीरामाच्या घोषणांमुळे आजूबाजूचा परिसर देखील राममय झाला होता.