काल (22 जानेवारी) अयोध्येतील मंदिरात रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे सध्या संपूर्ण जगभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. तसेच प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते.
तर रामलल्लाच्या या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला विविध धर्म आणि पंथाचे ऋषी-मुनी उपस्थित होते.पण काही काळापासून सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेले संत प्रेमानंद महाराज या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते. अशातच आता याबाबत दैनंदिन प्रश्नोत्तराच्या सत्रात एका भक्ताने महाराजांना प्रश्न विचारला. यावर प्रेमानंद महाराज यांनी खास उत्तर दिले असून ते त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे.
खाजगी संभाषणात सहभागी झालेल्या एका भक्ताने वृंदावनातील प्रसिद्ध संत प्रेमानंद यांना विचारले की, महाराज तुम्ही रामलल्लाच्या अभिषेक प्रसंगी दर्शनासाठी अयोध्येला का गेला नाही? यावर प्रेमानंदजी महाराजांनी कारण सांगितले आहे.
प्रेमानंद जी महाराज म्हणाले की, “माझ्या दोन्ही किडन्या खराब आहेत त्यामुळे मला प्रवास करणे अवघड आहे. आम्ही जाऊ शकलो नाही हे आमचे दुर्दैव आहे. याशिवाय आम्ही श्रीधामशी एकनिष्ठ आहोत. तसेच दशरथ नंदनला आपण मनापासून आशीर्वाद देतो. आशीर्वाद देण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते. ते का?..कारण आपण त्यांचे आहोत आणि ते आपले आहेत.”