अयोध्येतील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींनी एका नवीन योजनेची घोषणा केली असून या योजनेचे नाव ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ असे आहे. या योजनेमुळे सर्वसामान्यांना वीज बिलात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेद्वारे सरकारने एक कोटीहून अधिक घरांच्या छतावर सोलर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांकडून विजेवर खर्च होणारा पैसा वाचवणे हा या योजनेचा उद्देश आहे. तसेच या योजनेबाबतची माहिती पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करून दिली आहे.
X वर पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, “जगातील सर्व भक्तांना भगवान श्री रामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते. तर आता अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी, हा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे.”
पंतप्रधानांनी पुढे लिहिले की, “अयोध्येहून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांच्या छतावर सोलर बसवण्याचे लक्ष्य घेऊन ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल.”
https://twitter.com/narendramodi/status/1749415140662055073
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा सर्वाधिक लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच या योजनेची घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्याबाबत बोलले आहे. सोबतच, हे रूफटॉप सगळ्यात आधी कुठे स्थापित केले जातील याचा रोडमॅप सरकार लवकरच जाहीर करणार आहे.