हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी विभागाशी संबंधीत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आज, मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हरियाणासह हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये 12 ठिकाणी छापेमारे केली.
पंचकुला, मोहाली आणि हरयाणातील इतर भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चुकीच्या पद्धतीने कोट्यवधी रुपयांचे बनावट रिफंड घेतल्याचे हे प्रकरण आहे. ही फसवणूक 2015 ते 2019 दरम्यान करण्यात आली होती. रिअल इस्टेटशी संबंधित अनेक कंपन्या आणि हरयाणातील अधिकारी या प्रकरणात रडारवर आहेत. दुसरीकडे, हरयाणा नागरी विकास प्राधिकरण विभागाशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण हिमाचलशीही जोडले गेले आहे.
हिमाचलमधील सोलन आणि बद्दी येथेही शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. अनेक सरकारी अधिकारी आणि काही निवृत्त अधिकाऱ्यांसह खासगी आरोपींच्या ठिकाणांवर ईडीची कारवाई सुरू आहे. तपास यंत्रणेती सूत्रानुसार, अनेक रिअल इस्टेट व्यावसायिक आता ईडीच्या रडारवर आले आहेत. यामध्ये सुनील कुमार गर्ग, मनोज पाल सिंगला, कंपनी सर्टेन फ्यूसर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, फॅब्युलस फ्यूचर प्रायव्हेट लिमिटेड, युनिसिटी कन्स्ट्रक्शन्स आणि इतर काही अज्ञात सरकारी आणि खाजगी आरोपींचा समावेश आहे.