काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान झालेल्या गोंधळाप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेय. काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये आज, मंगळवारी झालेल्या संघर्षानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिलेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा आसामच्या गुवाहाटी येथे पोहोचली आहे. याठिकाणी आज, मंगळवारी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापट झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. राहुल गांधींना शहरात फिरू न दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या चकमकीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत आसामच्या डीजीपींना राहुल गांधींवर एफआयआर दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिमंता बिस्वा सरमा आपल्या ट्विटर (एक्स) संदेशात म्हणाले की, हिंसा हा आसामच्या संस्कृतीचा भाग नाहीत. आम्ही शांतताप्रिय राज्य आहोत. असे ‘नक्षलवादी डावपेच’ आमच्या संस्कृतीला पूर्णपणे नवीन आहेत. मी आसाम पोलिसांच्या डीजीपींना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात जमावाला भडकवल्याबद्दल गुन्हा नोंदवण्याचे आणि त्यांच्या हँडलवर पोस्ट केलेले फुटेज पुरावा म्हणून वापरण्याचे निर्देश दिले आहेत. राहुल गांधींचे अनियंत्रित वर्तन आणि मान्य मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन यामुळे गुवाहाटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.