भूपेंद्र यादव यांनी शेअर केला शावकांचा व्हिडीओ
मध्यप्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये तीन नवे पाहुणे आले आहेत. नामिबियातून आणलेल्या ज्वाला नामक मादी चित्ताने 3 पिलांना जन्म दिलाय. या नवजात शावकांची प्रकृती उत्तम असल्याचे कुनो पार्कच्या वैद्यकीय पथकाने म्हंटले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी या पिलांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय.
पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, ‘कुनोचे नवे शावक, ज्वाला नावाच्या नामिबियन चितेने तीन शावकांना जन्म दिला आहे, नामिबियन चित्ता आशाने तिच्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांनंतर ही आणखी एक आनंदाची बातमी आहे. सर्व वन्यजीव वन्यजीव प्रेमींना हार्दिक शुभेच्छा. भारतामध्ये वन्यजीवांची अशाच प्रकारे भरभराट होत राहिली पाहिजे. चीता प्रकल्प यशस्वी होवो.” असे यादव यांनी आपल्या संदेशात नमूद केलेय.
मादी चित्ता ज्वालाने मार्च 2023 मध्ये 4 शावकांना जन्म दिला होता. मात्र, यातील एकच पिल्लू हे जिवंत राहू शकले. त्यानंतर कुनो व्यवस्थापनाने शावकांच्या मृत्यूचे कारण तीव्र उष्णता असल्याचे सांगितले होते. ज्वाला ही पूर्वी शिया नावाने ओळखली जात होती, नंतर तिचे नाव ‘ज्वाला’ ठेवण्यात आले. कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या महिनाभरात आतापर्यंत 6 पिल्ले जन्माला आली आहेत. नामिबियातील ज्वाला या मादी चित्तेने 3 पिल्लांना जन्म दिला आहे. तर, आशा नामक मादी चित्ताने 3 जानेवारी रोजी तीन पिल्लांना जन्म दिला होता. हे सर्व चित्ते निरोगी असून केएनपी टीम त्यांची विशेष काळजी घेत आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये आता हळूहळू चित्त्यांची संख्या वाढत आहे.