आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. बारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून रोहित पवार यांची चौकशी होणार आहे. तर ईडी चौकशीला कार्यालयात जाण्यापूर्वी रोहित पवारांनी विधानभवनाला भेट दिली. त्यानंतर आता ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.
ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी रोहित पवार हे हॉटेल ट्रायडेंट मधून विधिमंडळात गेले. तेथे त्यांनी थोर पुरूषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यानंतर रोहित पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले आणि तेथे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कार्यकर्त्यांची भेट त्यांनी घेतली. भेट घेतल्यानंतर ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी रवाना झाले यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील होत्या.
रोहित पवार हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले असता कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. ‘एकच वादा रोहित दादा’ अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर देत त्यांनी रोहित पवारांना पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, ईडी चौकशीला जाण्यापूर्वी रोहित पवार म्हणाले की, “ईडी अधिकारी त्यांचे काम करत असताना त्यांनी मला जी कागदपत्रे मागवली ती मी दिली आहेत. तसेच मी पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करेन. पण या चौकशीमागे कुठली शक्ती आहे? काय विचार आहेत? हे आत्ताच सांगता येणार नाही. कदाचित आम्ही एका बलाढ्य शक्तीविरोधात लढत आहोत म्हणून ही कारवाई झाली असेल.”
“अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत जी माहिती मागवली आहे ती माहिती आम्ही ईडी, सीआयडी आणि ईडब्ल्यूओही दिली आहे. तीच माहिती आता मी पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात घेऊन जाणार आहे. तसेच मला ईडीचे अधिकारी जे काही प्रश्न विचारतील त्याची उत्तरे आम्ही देऊ”, असेही रोहित पवार म्हणाले.