अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांनासाठी मंदिर खुले करण्यात आले आणि त्यानंतर मागच्या दोन दिवसात अयोध्येत प्रचंड गर्दी झाली आहे. रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती संख्या पाहता मंदिर प्रशासनाने दर्शनाच्या वेळेत बदल केले आहेत.
आधी रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. मात्र, आता या वेळेत बदल करण्यात आले आहेत. मंदिर प्रशासनाने आता दर्शनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता भाविक रामलल्लाचे दर्शन रात्री 10 वाजेपर्यंत घेऊ शकतात. तसेच सकाळी भाविकांना 7 ते 11.30 या वेळेत दर्शन घेता येणार आहे.
रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविक रात्रीपासून रांगेत उभे राहत आहेत. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पोलिसांनी रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या तीन रांगा बनवल्या आहेत. तसेच कालच्या तुलनेत आज मंदिर परिसरात चांगली व्यवस्था केली आहे.
दरम्यान, काल रामभक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला होता. प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व सीमा सील केल्या होत्या. तसेच अयोध्येकडे कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जात नव्हता. सोबतच ट्रॉली बॅरिअर्स आणि बांबूचे खांब लावून पोलीस कर्मचाऱ्यांसह निरीक्षक तैनात करण्यात आले होते.