अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मंगळवारपासून सर्वसामान्यांसाठी दर्शनाला सुरुवात झाली आहे. तसेच पहिल्या दिवशी 5 लाखांहून अधिक लोकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. तर बुधवारी म्हणजेच आजही लाखो भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी आले आहेत.
येत्या काही दिवसांमध्ये मंदिरात भाविकांची गर्दी कमी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेऊन भाजपशासित राज्यांच्या मंत्रिमंडळाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. नियोजित तारखेलाच राज्य मंत्र्यांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. तसेच लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत.
अमित शाह 4 फेब्रुवारी रोजी अवधानगरीत पोहोचतील आणि रामलल्लाचे दर्शन घेतील. तर मंत्र्यांच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाल्यास, उत्तर प्रदेशचे मंत्रिमंडळ 1 फेब्रुवारीला रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. तसेच उत्तराखंड मंत्रिमंडळ 2 फेब्रुवारीला तर राजस्थान मंत्रिमंडळ 3 फेब्रुवारीला भेट देणार आहे.
दरम्यान, रामलल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या पाहता मंदिर प्रशासनाने दर्शनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता भाविकांना रात्री 10 वाजेपर्यंत रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. आधी ही वेळ फक्त संध्याकाळी 7 पर्यंत होती. तर आता सकाळच्या वेळी 7 ते 11.30 या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
सोमवारी अयोध्येत रामलल्लाचा अभिषेक झाल्यानंतर मध्यरात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली होती. मंगळवारी पाच लाखांहून अधिक भाविकांनी प्रभू रामाच्या बालस्वरूपाचे दर्शन घेतले. तसेच भाविकांची प्रचंड गर्दी पाहता अनेकवेळा गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत होते, मात्र पोलीस प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत लोकांना रांगेत उभे करून प्रभू रामाचे दर्शन घेऊ दिले.