नवी दिल्ली : गेमिंग अॅप्सद्वारे होणाऱ्या फसवणूकीबाबत गृह मंत्रालयाच्या सायबर शाखेने (MHA) मोठा अलर्ट दिला आहे. लोकांना ऑनलाइन गेमिंगमध्ये व्यस्त असताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सायबर शाखेने केले आहे.
भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (14C), MHA च्या सायबर विंग अंतर्गत कार्यरत, एक सावधगिरीचा संदेश जारी करण्यात आला आहे. “स्मार्ट खेळा, सुरक्षित खेळा – ऑनलाइन गेमिंग करताना सुरक्षित रहा!” असा संदेश सायबर शाखेने दिला आहे. तसेच या संदेशाद्वारे 14C विंगने लोकांना फक्त ” Google Play Store, Apple Store आणि अधिकृत वेबसाइट्स सारख्या अधिकृत स्त्रोतांकडून ऑनलाइन अॅप्स डाउनलोड करण्याचे आवाहन केले आहे.”
भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने “वेबसाइट वैधता सुनिश्चित करण्यासाठी गेम अॅप प्रकाशकांची माहिती नेहमी तपासा” असा सल्ला दिला आहे. तसेच “गेममधील अॅप खरेदी आणि किफायतशीर सबस्क्रिप्शन ऑफरच्या जाळ्यात कधीही पडू नका. आणि चॅट्स किंवा फोरममध्ये वैयक्तिक माहिती सामायिक करताना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे, कारण स्कॅमर खेळाडूंना हाताळण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू शकतात. तसेच कोणतेही अॅप डाउनलोड करताना फक्त संबंधित आणि आवश्यक परवानग्या द्या,” अशी शिफारस सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने केली आहे.
केंद्राने गेल्या वर्षी 15 डिसेंबरपर्यंत एकूण 581 अॅप्स ब्लॉक केले होते आणि त्यापैकी 174 बेटिंग आणि जुगार अॅप्स आणि 87 कर्ज देणारी अॅप्स होती. हे अॅप्स MHA च्या शिफारशींवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) ब्लॉक केले होते. हे अॅप्स IT कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत ब्लॉक करण्यात आले होते. या गेमिंग अॅप्लिकेशन्समध्ये PUBG, garena Free Fire यांचाही समावेश होता.
तसेच गेल्या वर्षी जुलैमध्ये केंद्राने IGST कायद्यात सुधारणा करून सर्व ऑफशोअर गेमिंग कंपन्यांना भारतात नोंदणी करणे बंधनकारक केले होते. शिवाय, या कायद्याने केंद्राला नोंदणीकृत नसलेल्या आणि कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या वेबसाइट ब्लॉक करण्याचा अधिकार दिला आहे.
महादेव व्यतिरिक्त ज्या अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती त्यात Parimatch, Fairplay, 1XBET, Lotus365, Dafabet आणि Betwaysatta यांचा समावेश आहे.
अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सांगितले की, 14C च्या शिफारशीवरून 500 हून अधिक इंटरनेट-आधारित अॅप्स ब्लॉक करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांच्यासमवेत 14C च्या कामकाजाचा आढावा घेताना शहा यांनी हे विधान केले होते.
cybercrime.gov.in या पोर्टलवर 20 लाखांहून अधिक सायबर-गुन्हेगारी तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत, ज्याच्या आधारावर 40,000 हून अधिक एफआयआर नोंदवले गेले आहेत. तसेच जानेवारी 2020 मध्ये या पोर्टलची सुरूवात झाल्यापासून 13 कोटी हिट्सची नोंद झाली आहे”, असेही शाह यांनी सांगितले.
14C विंगने एकत्रित केलेल्या अहवालानुसार, दररोज सरासरी 5,000 हून अधिक सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवल्या जातात. अहवालात 2021 ते 2022 पर्यंत सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींमध्ये 113.7 टक्के आणि 2022 ते 2023 पर्यंत 60.9 टक्के वाढ झाल्याचा उल्लेख आहे. तसेच नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) वर नोंदवलेल्या वाढत्या तक्रारींनुसार 2023 मध्ये 15,56,176 सायबर क्राइम तक्रारी आहेत; 2022 मध्ये 9,66,790; 2021 मध्ये 4,52,414; 2020 मध्ये 2,57,777; आणि 2019 मध्ये 26,049 सायबर क्राइम तक्रारी आहेत.