आसाम रायफल्समधील एका जवानाने मंगळवारी रात्री आपल्या सहा सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना मणिपूरमध्ये घडली आहे. त्यानंतर त्याने स्वतःवर देखील गोळी झाडली. यामध्ये या जवानाचा मृत्यू झाला. तसेच गोळीबार केलेले सहा सहकारी या घटनेत जखमी झाले. या संपूर्ण घटनेचा मणिपूरमधील जातीय हिंसाचाराशी कोणताही संबंध नसल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना भारत-म्यानमार सीमेजवळ तैनात असलेल्या आसाम रायफल्स बटालियनमध्ये घडली, असे आसाम रायफल्सचे महानिरीक्षक यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
IGAR कडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेले सर्व सैनिक हे गैर-मणिपुरी होते. त्यांना पुढील उपचारांसाठी चुराचंदपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ”मणिपूरमध्ये सुरु असलेल्या जातीय संघर्षामध्ये कोणतीही समभाव्य अफवा दूर करण्यासाठी तसेच कोणतिही अटकळ टाळण्यासाठी घटनेचे तपशील पारदर्शकपणे सामायिक करणे महत्वाचे आहे. तसेच या दुर्दैवी घटनेचा सध्या सुरु असलेल्या संघर्षाशी संबंध जोडू नये, कारण जखमी झालेल्यांपैकी कोणीही मणिपूरचे नाही.”, असे IGAR च्या अधिकृत निवेदनामध्ये म्हणण्यात आले आहे.
केंद्रीय निमलष्करी दलाने सांगितले की, वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ”आसाम रायफल्सच्या सर्व बटालियनमध्ये विविध समुदायांच्या लोकांसह मिश्रित वर्ग रचना आहे. मणिपूरमध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी समाजाचे ध्रुवीकरण पासूनच सर्व कर्मचारी एकत्रितपणे काम करत आहेत”, असे अधिकृत निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.