मध्यप्रदेशातील काँग्रेसचे 228 पदाधिकारी भाजपात
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी मध्य प्रदेशातील चंबलच्या खोऱ्यात पुन्हा राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत काँग्रेसला झटका दिला आहे. काँग्रेसच्या छोट्या मोठ्या अशा 228 नेत्यांना भाजपात प्रवेश करवण्यात आलाय. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठ्या राजकीय संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
गेल्या आठवड्यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचे माजी आमदार राकेश मावई यांना भाजपात आणले होते. मुरैना विधानसभेचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे आमदार राहिलेले राकेश मवई पक्षात नाराज होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले गेले होते. यामुळे त्यांनी निवडणुका झाल्यानंतर भाजपात प्रवेश केला.
शिंदे यांच्यासोबत दिल्लीत गेले आणि भाजपात प्रवेश करवला होता. यानंतर मुरैनामध्ये येत शिंदे यांनी मुरैनातील काँग्रेसच्या 228 पदाधिकाऱ्यांना भाजपची वाट धरायला लावली. भाजपमध्ये दाखल झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुरैना महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजू शर्मा, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष हसनैन खान, बनमोर ब्लॉकचे सर्व मंडल अध्यक्ष, मुरैना दक्षिण आणि 15 सेक्टर आणि मुरैना उत्तर आणि जिल्ह्यातील 7 विभागांचे सेक्टर अध्यक्ष आहेत. विधानसभेनंतर त्यांचा पक्ष प्रवेश होत असला तरी लोकसभेसाठी हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे.