पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) आवारात एका विद्यार्थी संघटनेने बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ फलक लावल्याने तणाव निर्माण झाला होता. फलक लावण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर मंगळवारी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अखेर फलक हटविण्यात आल्याने तणाव निवळला. या प्रकरणी ‘एफटीआयआय’मधील विद्यार्थी संघटनेच्या सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये सायनतन चरण चक्रवर्ती, नाथन चक्रपाध्याय, मनकलन चक्रवर्ती, त्रिशा बंदना मन्ना, मधुरिमा मगन्का मैती, मनकप सेलोन नोकवोहम, रितागनिकी देबारती भट्टाचार्या अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ऋतुजा अतुल माने (रा. कोथरुड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.