अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सर्वसामान्यांना मंगळवारपासून दर्शनाची परवानगी मिळाली आहे. दर्शनाला सुरुवात झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आज, बुधवारी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
दर्शनासाठी मंदिर सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 5 लाख भाविकांनी श्रीरामांचे दर्शन घेतले. काल मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आल्याने चेंगराचेंगरीचीही परिस्थिती निर्माण झाली होती. भाविकांची ही गर्दी पांगवणं पोलिसांसाठीही मोठी कसरत होती. गर्दीचे योग्य नियोजन न केल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाराज झाले. त्यानंतर मुख्यमंत्री थेट अयोध्येला पोहचलेत. सुरक्षेच्या कारणास्थव सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. तब्बल 8 हजार अतिरिक्त पोलीसांचा ताफा तैनात करण्यात आलाय. तर लखनऊमधून अयोध्येला येणाऱ्या बसही थांबवण्यात आल्या आहेत.
अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यानंतर मंगळवारी राम मंदिराच्या अधिकृत उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी एक नवा विक्रम झाला. मंदिर उघडण्याच्या पहिल्याच दिवशी पाच लाख राम भक्तांनी रामललाचे दर्शन घेतले. अयोध्येला पोहोचणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता प्रशासनानं येथे येणाऱ्या सर्व वाहनांना तातडीने बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम लखनऊ येथूनच लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतः मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षा आणि इतर व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी देशाच्या विविध भागातून अयोध्येत पोहोचणाऱ्या भाविकांना संयम आणि सहकार्याचे आवाहन केले. श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत होणारी प्रचंड गर्दी पाहता येथे येणाऱ्या सर्व वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.