2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर निघालेल्या राहुल गांधींच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुवाहाटी, आसाममध्ये पोलिसांसोबत काँग्रेस समर्थकांच्या कथित चकमकीनंतर राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि कन्हैया कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्यावर पोलिसांसोबत हिंसाचार, भडकावणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक करणार असल्याचे म्हटले आहे. आम्ही आता कारवाई केली तर ते त्याला राजकीय चाल म्हणतील, असेही बिस्व सरमा यांनी म्हटले आहे.
एका निवेदनात मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा म्हणाले की, “राहुल गांधींच्या दौऱ्याचा संपूर्ण हेतू आसामला त्रास देणे आणि आसाममधील शांतता धोक्यात घालणे हा आहे. आम्ही त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आता त्यांना हवे ते करू द्या.”
“आम्ही एक एसआयटी स्थापन करू, जी या प्रकरणाची चौकशी करेल. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राहुल गांधींना अटक करणार आहे. आम्ही आता कारवाई केली तर ते त्याला राजकीय खेळी म्हणतील. आमच्याकडे पुरावे आहेत. त्यांनी ज्या प्रकारे लोकांना भडकावले, त्यामुळे गुवाहाटीमध्ये मोठी अनुचित घटना घडू शकते”, असेही सरमा म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय’ यात्रा मंगळवारी गुवाहाटीला पोहोचली होती, त्यावेळी त्यांना आसाम पोलिसांनी रोखले होते. मात्र, राहुल गांधींना आपल्या ताफ्यासह गुवाहाटी शहरातून जायचे होते, परंतु प्रशासनाने परवानगी दिली नाही. पोलिसांनी गुवाहाटी शहराकडे जाणारा रस्ता अडवला. यानंतर काँग्रेस समर्थकांची पोलिसांशी झटापट झाली. त्यांनी बॅरिकेड्स तोडले. त्यानंतर मुख्यमंत्री बिस्व सरमांनी राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या.