अयोध्येत आज (25 जानेवारी) पौष पौर्णिमेनिमित्त भाविक रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. तसेच राम मंदिरात दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मंदिरातील दर्शनाची वेळ सध्या वाढवण्यात आली आहे. अशातच आता पौष पौर्णिमेनिमित्त बुधवारी रामलल्लासाठी महाराष्ट्रातून 80 किलो वजनाची खास तलवार पाठवण्यात आली आहे.
रामलल्लासाठी देशभरातून आणि जगभरातून अनेक भेटवस्तू येत आहेत. तर आता रामलल्लासाठी महाराष्ट्रातून खास भेट पाठवण्यात आली आहे. प्राचीन शस्त्रास्त्रांचे निर्माते नीलेश अरुण हे आपल्या सहकाऱ्यांसह गेल्या बुधवारी मुंबईहून सोन्याची तलावर घेऊन अयोध्येला पोहोचले. ‘नंदक खडग’ असे या तलवारीचे नाव आहे. त्यांनी शुद्ध सोन्यापासून बनवलेली ‘नंदक खडग’ ही तलवार श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला अर्पण केली आहे. विशेष बाब म्हणजे निलेश अरुण यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यासाठी शस्त्रास्त्रे बनवत होते.
नीलेश अरुण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नंदक खडग’ ही तलवार 7 फूट 3 इंच उंच आहे. तिचे वजन सुमारे 80 किलो आहे. ती पितळ आणि सोन्याचे बनलेली आहे. मात्र, त्याची किंमत आणि त्यात किती सोन्याचा वापर करण्यात आला याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यांच्या मते श्री रामजींवर त्यांची अपार भक्ती आहे, त्यामुळेच त्यांनी ‘नंदक खडग’या तलवारीची निर्मिती केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1750314155427365197
दरम्यान, आज रामलल्लाच्या अभिषेकनंतर, 25 जानेवारी 2024 रोजी पहिले महास्नान झाले आणि या दरम्यान भक्तांनी शरयूमध्ये श्रद्धेने स्नान केले. अयोध्या मंदिराच्या उद्घाटनानंतरची ही पहिली पौष पौर्णिमा आहे. यानिमित्ताने उत्तर प्रदेशातील काशी, प्रयागराज आणि उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये गंगा स्नानासाठी गर्दी जमली असली तरी यावेळी भाविक पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने अयोध्येत पोहोचले आहेत.