मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चा आजचा सहावा दिवस आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे. २० तारखेपासून जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे. त्यांच्या या मोर्चाला मराठा समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. काल जरांगे पाटील यांचा मोर्चा पुण्यात आला असता त्यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. मात्र २६ तारखेला हे भगवे वादळ मुंबईत धडकणार आहे. हा मोर्चा मुंबईत येऊ नये यासाठी सरकार मनोज जरांगे पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त लोणावळ्यात दाखल झाले आहेत. यावेळी मधुकर अर्दड हे जरांगे पाटलांची भेट घेणार असून, आंदोलन स्थगित करण्याची विनंती देखील त्यांना केली जाणार आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा उद्या मुंबईत धडकणार आहेत. आंदोलनासाठी त्यांनी आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या मैदानाची मागणी केली आहे. मात्र अद्याप त्यांना परवानगी मिळालेली नाही. तसेच जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर काल सुनावणी पार पडली. यावेळेस उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी मोठ्या वेगाने काम करत आहे असे मुख्यमंत्री शिंदेंचे म्हणणे आहे. तसेच जरांगे पाटलांनी संयम राखावा असे आवाहन त्यांनी जरांगे पाटलांना केले आहे.
दरम्यान उच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान आम्हालाही न्यायमंदिरात न्याय मिळेल असा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केला. काल त्यांच्या पुण्यातील मोर्चा मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच आज हा मोर्चा पनवेल ते ठाणे या दरम्यान मुक्कामी असणार आहे. उद्या मुंबईत हा मोर्चा धडकणार आहे.