सध्या दिग्गज बॉक्सर मेरी कोमने बॉक्सिंगला राम राम केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. काल (24 जानेवारी) मेरी कोमने बॉक्सिंगमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्याचे म्हटले जात होते, पण, आता या चर्चांदरम्यान मेरी कोमने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे मेरीने आज (25 जानेवारी) बॉक्सिंगमधून निवृत्ती जाहीर केल्याच्या चर्चांवर भाष्य केले आहे.
मेरी कोमने म्हटले आहे की, “माध्यमातील प्रिय मित्रांनो, मी अद्याप माझ्या निवृत्तीची घोषणा केलेली नाही आणि माझ्याबद्दल चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. मला जेव्हा ही घोषणा करायची असेल तेव्हा मी वैयक्तिकरित्या मीडियासमोर येईन. काही मीडिया रिपोर्टनुसार मी निवृत्तीची घोषणा केली असल्याचे सांगितले जात आहे, मात्र ते खरे नाही.”
“24 जानेवारी रोजी मी डिब्रूगढ येथील एका शाळेत गेले होते. तिथे मी म्हटले होते की,मला अजून खेळण्याची इच्छा आहे. पण माझे आत्ताचे वय पाहता मला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. तरीही मी माझा खेळ चालू ठेवला आहे. मी अजूनही माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे आणि जेव्हा मला माझी निवृत्ती जाहीर करायची असेल तेव्ही मी सगळ्यांसमोर येऊन जाहीर करेन”, असेही मेरी कोमने म्हटले आहे.
बॉक्सिंगच्या इतिहासातील मेरी कोम ही पहिली महिला बॉक्सर आहे जिने सहा जागतिक विजेतेपद पटकावले आहेत. पाच वेळा आशियाई चॅम्पियन 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला बॉक्सर होती. मेरी कोमने तिच्या बॉक्सिंग शैलीने सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच मेरी कोमला पद्मश्री, पद्म भूषण आणि अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.