न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी त्यांना पदाची शपथ दिली आहे .
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गेल्या आठवड्यात कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेल्या न्यायमूर्ती वराळे यांच्या पदोन्नतीची शिफारस केली होती याबाबतची अधिसूचना भारताच्या राष्ट्रपतींनी 24 जानेवारी रोजी जारी केली होती.
न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या व्यतिरिक्त न्यायमूर्ती वराळे हे दलित समाजातील सर्वोच्च न्यायालयाचे तिसरे विद्यमान न्यायाधीश असतील.ते अनुसूचित जातीचे उच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत तर देशभरातील उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांमध्ये अनुसूचित जातीचे एकमेव मुख्य न्यायाधीश आहेत.
61 वर्षीय न्यायमूर्ती वराळे हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदवीधर आहेत. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ दिवाणी, फौजदारी, कामगार आणि प्रशासकीय बाबींमध्ये कायद्याचा सराव केला आहे. ते यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.