ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली आहे. तसेच ईडीने आता पाच लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना नोटीस बजावली आहे. खिचडी घोटाळ्याप्रकरणी ३० जानेवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजार राहण्याचे आदेश या नोटिसीमधून देण्यात आले आहेत. यमुकले संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांना नोटिसी देणे हा एकमेव उद्योग भाजपचा सुरु आहे अशी टीका राऊतांनी केली आहे. तसेच संदीप राऊत यांना चौकशीसाठी दिलेले ईडीचे कारण हे हास्यास्पद असल्याचे देखील ते म्हणाले.
संजय राऊत हे माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी ते म्हणाले, ”संदीप राऊत यांना नोटीस आली आहे हे मला माहिती आहे. त्यांचे हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी त्यांचे कीचन वापरण्यात आले. त्यात माझ्या मुलीने त्यांना मदत केली. या विषयी ही नोटीस पाठवली आहे. हे किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे. मात्र आम्ही गुडघे टेकणार नाही. राज्यामध्ये काय मोगली सुरु आहे का ? दोन-पाच लकहसाठी तुम्ही आम्हाला नोटीस पाठवताय. मग तुम्ही काय चिंचोके खाता? लढाई आमच्याशी आहे तर कुटुंबापर्यंत का जाता?”
दरम्यान, केवळ विरोधी पक्षाच्या लोकांना केंद्रीय यंत्रणा त्रास देत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. बारामती ऍग्रो प्रकरणी काल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडीने तब्बल ११ तास चौकशी केली. तसेच १ फेब्रुवारीला पुन्हा एकदा चौकशीला हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ईडीने कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना देखील अटक केली आहे. तसेच ते सध्या ईडी कोठडीत आहेत. मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचे म्हणत सुरज चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.