अंतरिम अर्थसंकल्प 2024 च्या तयारीच्या शेवटच्या टप्प्याचे प्रतीक असलेला हलवा समारंभ 24 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड यांच्या उपस्थितीत नॉर्थ ब्लॉक येथे हा कार्यक्रम पार पडला.
या हलवा समारंभात केंद्रीय अर्थमंत्र्यांसह वित्त आणि खर्च सचिव डॉ.टी.व्ही. सोमनाथन, आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ, डीआयपीएएम सचिव तुहिन कांत पांडे, महसूल सचिव संजय मल्होत्रा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) चे अध्यक्ष नितीन गुप्ता, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल आणि अतिरिक्त सचिव (अर्थसंकल्प) आशिष वाचानी, अर्थसंकल्प तयार करणे आणि संकलन प्रक्रियेत गुंतलेले वित्त मंत्रालयाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते.
हलवा समारंभ का साजरा केला जातो?
भारतात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी तोंड गोड करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हलवा समारंभ आयोजित केला जातो. तसेच ही परंपरा वर्षानुवर्षे पाळली जात आहे.
मागील तीन पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पांप्रमाणे, अंतरिम अर्थसंकल्प 2024 देखील पेपरलेस असेल. सर्व बजेट दस्तऐवज “केंद्रीय बजेट मोबाईल अॅप” वर उपलब्ध असतील. हे दोन भाषांमध्ये आहे (इंग्रजी आणि हिंदी). हे अॅप www.indiabudget.gov.in वरूनही डाउनलोड करता येईल. अर्थसंकल्पाची कागदपत्रे 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर मोबाईल अॅपवर उपलब्ध होतील.