आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडत आहे. आजच्या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडीकडून वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी कोणतेच निमंत्रण नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, गेल्या 24 तासात इंडिया आघाडीमध्ये झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना देण्यात आले होते मात्र इंडिया किंवा महाविकास आघाडीचा घटक पक्ष नसताना भारत जोडो यात्रेमध्ये सामील होणं आमच्यासाठी अडचणीचं ठरू शकेल असे प्रकाश आंबेडकरांनी मत व्यक्त करत नकार दिला होता. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष हा विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये सामील होणार अशी चर्चा आहे. त्याबाबत दिल्लीमध्ये बैठक झाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून मान्यता आहे. पण अंतिम निर्णय मात्र अद्याप झालेला नाही.
कदाचित ममता बॅनर्जी यांनी काल इंडी आघाडीतून बाहेर पडत एकला चलो रे चे धोरण जाहीर केल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीने वंचित बद्दल सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे