आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला 2023 सालचा वनडे प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे. याआधीही कोहलीने तीनदा हा पुरस्कार मिळवला आहे. तर आता हा पुरस्कार त्यांच्या नावावर चौथ्यांदा आला आहे. आतापर्यंत जगातील एकाही फलंदाजाला चारवेळा वनडे प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला नाही. त्यामुळे कोहलीचा हा नवा एक विक्रम आहे.
2023 हे वर्ष विराट कोहलीसाठी खूप चांगले होते. 2023 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या ICC एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याने अनेक स्फोटक खेळी खेळल्या. एवढेच नाही तर विराट कोहलीने क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा 49 वनडे शतकांचा विक्रमही मोडला होता. त्याने आता वनडेत 50 शतके पूर्ण केली आहेत. कोहलीने यंदाच्या विश्वचषकात 765 धावा केल्या, जे एकदिवसीय विश्वचषकाच्या एका हंगामातील सर्वाधिक धावा आहेत. कोहलीने यावर्षी एकूण 1377 धावा केल्या. तो आता आठव्यांदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका वर्षात एक हजाराहून अधिक धावा करणारा जगातील फलंदाज बनला आहे.
विराट कोहलीच्या एकदिवसीय आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर कोहलीने आतापर्यंत 292 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि एकूण 13,848 धावा केल्या आहेत. येथे त्याची सरासरी 58.67 आणि स्ट्राइक रेट 93.58 आहे. 50 शतकांसोबतच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 72 अर्धशतकेही केली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 1294 चौकार आणि 151 षटकार आहेत.
विराट कोहली व्यतिरिक्त, भारताच्या शुभमन गिल आणि मोहम्मद शमीच्या नावांचा देखील ICC ने वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडूसाठी समावेश केला आहे. यासोबतच न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान, सध्या कोहली कौटुंबिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर आहे. तसेच तिसऱ्या सामन्यात तो पुनरागमन करेल अशी आशा आहे.