आज (26 जानेवारी) संपूर्ण देशभरात भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानावर ध्वजारोहण होणार आहे. याआधी मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी देशाच्या प्रगतिमध्ये महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे असल्याचा उल्लेख केला.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, आज संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने मी राज्यातील जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच मी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनाही विनम्र अभिवादन करतो. तसेच स्वातंत्रलढ्यातील क्रांतिकारकांना सुद्धा माझे वंदन.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. हे स्थान टिकवण्यासाठी महायुती सरकारने मागील दीड वर्षांच्या काळात आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पडली आहेत, हे मी आज अभिमानाने सांगू इच्छितो. महाराष्ट्राने सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, क्रिडा, औद्योगिक या सर्व आघाड्यांवर छाप टाकण्यास सुरूवात केली आहे. तसेच आपण म्हणतो की महाराष्ट्रात एक छोटा भारत वसलेला आहे आणि त्यामुळे भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी आपली एकजूट महत्त्वाची आहे.
तसेच संपूर्ण विश्वात भारत देश स्वत:चे स्थान निर्माण करण्यात यशस्वी होत आहे. याचे श्रेय देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायलाच पाहिजे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.