नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय हवाई दलाच्या महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि फ्लायपास्टमुळे महिलांच्या पुढच्या पिढीला करिअरचा पर्याय म्हणून सैन्यात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे वक्तव्य एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी केले आहे.
एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आमच्या क्षमता वाढत आहेत, आमचा दर्जा खूप उंच आहे आणि जेव्हा तुम्ही महिलांबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला माहित आहे की भारतीय हवाई दल ही पूर्णपणे लिंग-अज्ञेयवादी सेवा आहे. आमच्याकडे प्रत्येक शाखेत महिला अधिकारी कार्यरत आहेत. आमच्याकडून त्यांना प्रत्येक संभाव्य अभ्यासक्रम देण्यात आला आहे.”
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय वायुसेना अनेक क्षेत्रांमध्ये आपली क्षमता जोरदारपणे दाखवत आहे, ज्यामध्ये 16 महिला वैमानिकांनी कर्तव्य मार्गावर फ्लाय-पास्टमध्ये भाग घेतला आहे. विकसित भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, ‘आत्मनिर्भर’ लष्करी पराक्रम आणि वाढती नारी शक्ती या 90 मिनिटांच्या या परेडच्या प्रमुख विषय आहेत ज्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रथमच, सर्व महिलांचा त्रि-सेवेचा तुकडा कर्तव्यपथावर कूच करेल. भारतीय वायुसेनेच्या फ्लाय-पास्ट दरम्यान महिला वैमानिकही नारी शक्तीचे (स्त्री शक्ती) प्रतिनिधित्व करतील. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) च्या तुकड्यांमध्ये फक्त महिला कर्मचारी असतील.
याबाबत एअर चीफ मार्श म्हणाले की, “मला वाटते की, भारतीय वायुसेना सक्षम, सशक्त आणि स्वावलंबी अशी या वर्षीची थीम असलेल्या झांकीतून योग्य संदेश प्रतिबिंबित होईल. तसेच परेडमध्ये सहभागी झालेल्या महिलांची कामगिरी आणि या वर्षीच्या परेडमध्ये आणि फ्लाय पास्टमध्ये भाग घेणे या दोन्ही महिलांचे प्रदर्शन अधिकाधिक महिलांना भारतीय हवाई दलात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळेल. सोबतच महिला अग्निवीरांची पहिली तुकडीही यावेळी परेडमध्ये सहभागी होत आहे. मला खात्री आहे की, महिलांच्या पुढच्या पिढीला करिअर म्हणून IAF निवडण्यासाठी हे प्रेरणादायी ठरेल.”
दरम्यान, यावर्षी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस देखील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पदार्पण करत आहे.