भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीच्या कर्तव्यपथावर परेडला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण करून परेडला सुरुवात केली. त्यानंतर भारतीय सैन्य दलांची ताकद आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन नागरिकांना पाहायला मिळाले. कारण अनेक राज्यांचे चित्ररथ या परेडमध्ये सहभागाई झाले होते. यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ देखील सहभागी झाला होता. यंदाचा चित्ररथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. यावेळी शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ देखील दाखवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याबरोबरच ओडिशा, मध्य प्रदेश, मणिपूर, तेलंगणा आणि इतर राज्यांचे चित्ररथ देखील सहभागी झाले होते. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या चित्ररथ संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला अनेकदा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला आहे. यंदाही महाराष्ट्राचा चित्ररथ बाजी मारेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आज देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. त्यानिमिताने कर्तव्यपथावर भारताच्या तिन्ही सैन्य दलांकडून संचालन करण्यात येत आहे. आधुनिक शस्त्रात्रे आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन या परेडमध्ये पाहायला मिळत आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत. परेडला सुरुवात झाल्यानंतर सर्वात प्रथम घोडदळाने आणि त्यानंतर T-90 रणगाड्यातील लेफ्टनंट फैज सिंग यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी दिली. या रणगाड्याला भीष्म नावानेही ओळखले जाते आणि हे भारतीय लष्कराचे धोकादायक शस्त्र आहे. त्यामागे भारतीय बनावटीचे नाग क्षेपणास्त्र धावत होते. त्यानंतर तिन्ही दलांच्या महिला तुकड्यांनी देखील संचलन केले.