भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीच्या कर्तव्यपथावर परेडला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ध्वजारोहण करून परेडला सुरुवात केली. त्यानंतर भारतीय सैन्य दलांची ताकद आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन नागरिकांना पाहायला मिळाले. कारण अनेक राज्यांचे चित्ररथ या परेडमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये उत्तर प्रदेशचा खास चित्ररथ सहभागी झाला होता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तरप्रदेशच्या चित्र रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या खास चित्ररथामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापणेची झलक दाखवण्यात आली. या चित्ररथाची थीम ही ‘अयोध्या विकसित भारत-समृद्ध विरासत’वर आधारित आहे.
उत्तर प्रदेशच्या या चित्ररथाचा पुढील भाग हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रतिक आहे. या चित्ररथामध्ये प्रभू श्रीरामांच्या हाती धनुष्य घेतलेला पुतळा हा त्यांचे बालपणीचे स्वरूप दर्शवताना दिसत आहे. तसेच या रथाच्या मागील भागात मिसाईल आणि वंदे भारत रेल्वे दाखवण्यात आली आहे.