आज मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळासबोत चर्चा केली असून ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. ते म्हणाले की, “मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे हे संवेदनशील असून ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील. तसेच आता मागण्या मान्य झाल्या आहेत पण त्याची अमंलबजावणी ही शासकीय विहीत नियम असतात त्याप्रमाणे होत असते.”
“महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले आहे की, आपण आत्तापर्यंत 37 लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो. आता ही नवीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही संख्या 50 लाखांच्या वर जाईल. त्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये मनोज जरांगेंची मुख्य भूमिका असून मी त्यांचे अभिनंदन करतो”, असेही दीपक केसरकर म्हणाले.