मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीनंतर वाशीतील शिवाजी चौकात सभा घेतली. यावेळी मनोज जरांगेंनी सरकारचा जीआर मराठा समाज बांधवांना वाचून दाखवला आणि सरकारने मान्य केलेले मुद्दे देखील सांगितले. यावेळी जरांगेंनी त्यांची सविस्तर भूमिका देखील मांडली.
आज रात्रीपर्यंत सरकारने सगेसोयरीच्या मागणीचा जीआर तयार करावा. आम्हाला त्यांनी आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत जीआर तयार करून द्या. अन्यथा उद्या आमचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानाकडे जाईल. तसेच आरक्षण मिळाले किंवा नाही मिळाले तरी आझाद मैदानावर जाणारच, असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे.
आम्हाला मुंबईत यायची हौस नव्हती, आम्हीही काम करणारी माणसे आहोत. पण अद्याप सर्व सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश सरकारने दिला नाही. त्यामुळे आजच्या रात्रीत किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्ही सर्व सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश आम्हाला द्यावा. आम्ही आजची रात्र इथेच काढतो, तोपर्यंत सरकारने अध्यादेश काढावा. जोपर्यंत आम्हाला पूर्ण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगेंनी मांडली.