मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. शिष्टमंडळासोबतच्या या भेटीनंतर मनोज जरांगेंनी वाशीतील शिवाजी चौकात सभा घेतली. यावेळी मनोज जरांगेंनी सरकारचा जीआर मराठा समाज बांधवांना वाचून दाखवला आणि सरकारने मान्य केलेले मुद्दे देखील सांगितले. यावेळी जरांगेंनी त्यांची सविस्तर भूमिका देखील मांडली. तसेच सरकारने आरक्षण देईपर्यंत नोकर भरती करू नये, अशी मागणीही जरांगेंनी केली आहे.
सरकार ज्या नोकर भरती करणार आहेत त्या आरक्षण मिळेपर्यंत करू नका. जर भरती करायची असेलच तर आमच्या जागा राखीव ठेवा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. तसेच 100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला 100 टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे, अशी मागणीही जरांगेंनी सरकारकडे केली आहे. शिक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने सांगितले आहे की, राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पण असे शिक्षण फक्त मुलींनाच देणार आहे आणि मुलांना नाही त्यामुळे मोफत शिक्षणाचा जीआर आज रात्रीपर्यंत काढावा अशी मागणी जरांगेंनी केली.
पुढे जरांगे म्हणाले की, सरकराने 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यावे. तर आता त्यापैकी 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित केले असे सरकारने सांगतले आहे. तसेच 54 लाखातील काही लोकांची वंशावळीतील आडनावे नाहीत. त्यामुळे तालुका स्तरावर समिती स्थापन केली आहे. हे लोक वंशावळी जुळवणार आहेत.
आज रात्रीपर्यंत सरकारने सगेसोयरीच्या मागणीचा जीआर तयार करावा. आम्हाला त्यांनी आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत जीआर तयार करून द्या. अन्यथा उद्या आमचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानाकडे जाईल, तसेच आरक्षण मिळाले किंवा नाही मिळाले तरी आझाद मैदानावर जाणारच, असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे.
आम्हाला मुंबईत यायची हौस नव्हती, आम्हीही काम करणारी माणसे आहोत. पण अद्याप सर्व सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश सरकारने दिला नाही. त्यामुळे आजच्या रात्रीत किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्ही सर्व सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश आम्हाला द्यावा. आम्ही आजची रात्र इथेच काढतो, तोपर्यंत सरकारने अध्यादेश काढावा. जोपर्यंत आम्हाला पूर्ण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगेंनी मांडली.