स्वातंत्र्य आणि समतेसोबतच संपूर्ण देशात बंधुभाव असणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. समाजातील परस्पर बंधुभावच प्रजासत्ताकाच्या यशाची खात्री देत असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरच्या महाल परिसरातील संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहणानंतर उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
याप्रसंगी डॉ. भागवत म्हणाले की, भारतीय संविधान हा आपल्या व्यवस्थेचा आधार आहे. राज्यघटनेतील प्रस्तावना, मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकांचे कर्तव्य आणि अधिकार या 4 गोष्टींमध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही. डॉ. आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेत स्वातंत्र्य आणि समतेसोबत बंधुता या शब्दाचा समावेश केला होता. परंतु, विदेशातील काही उदाहरणांवरून असे दिसून आले की, जिथे स्वातंत्र्य आहे तिथे समानता नाही. स्वातंत्र्य आणि समता एकत्र ठेवण्यासाठी बंधुभावाची भावना असणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या 22 जानेवारीला अयोध्येत बंधुत्वाची ही भावना दिसून आली. बंधुभावाची हीच भावना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानेही दिसून येते. बंधुभावाच्या भावनेने भारताची ताकद जागृत झाली आहे. त्यामुळे भारतीय लोकांच्या कर्तृत्वाचा चमत्कार संपूर्ण जग पाहत आहे. भारत जगाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करेल, असे 40 वर्षांपूर्वी कोणी म्हटले असते, तर कदाचित कोणीही त्यावर विश्वास ठेवला नसता. पण भारतीय लोकांच्या परस्पर स्नेह आणि बंधुभावामुळे हे शक्य झाले आहे. यावेळी सरसंघचालक म्हणाले की, राष्ट्रध्वजाचा भगवा रंग त्यागाचे प्रतीक आहे. तर ध्वजावरील धर्मचक्र गतीचे प्रतीक आहे. या प्रतिकांपासून प्रेरणा घेऊन त्याग व शिस्तीचे पालन करावे, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले.