आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपले मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले उपोषण सोडले. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ लढा उभारला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेले साडे चार महिने मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लढा देत होते. जरांगे पाटील यांचा मोर्चा जालन्यातील अंतरवाली सराटी येथून नवीन मुंबईत पोहोचला होता. आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबईतील आझाद मैदानात जाऊन आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला होता. मात्र अखेर राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, ”मी देखील एक शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोरगरीब, मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे. मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचे काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती आहे. माझे गुरुवर्य हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे तसेच समस्त सकल मराठा समाजाचे आशीर्वाद देखील माझ्या पाठीशी आहेत. मी इथे जमलेल्या तमाम मराठा बंधू भगिनींचे स्वागत करतो. मनापासून अभिनंदन करतो. खरे तर हा ऐतिहासिक क्षण आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या भूमीत आज हा ऐतिहासिक लढा यशस्वी झाला. त्यांनाही मी वंदन करतो. आमचे सरकार हे तुमचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे माता भगिनींचे, गोरगरिबांचे सरकार आहे. आम्ही कधीही मतांसाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेले आहेत.”
दरम्यान, थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांच्यासह वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार अशी शपथ घेतली होती. अखेर राज्य सरकारने अध्यादेश काढत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.